धाराशीव : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठलसाई आणि खेड येथील लोकमंगल साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले आहे, तर समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार (राजगंगा) कारखाना तांत्रिक अडचणीमुळे अद्याप सुरू व्हायचा आहे. अशा परिस्थितीत, सर्वच ऊस कारखान्यांना जाणे शक्य नसल्याने आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा गूळनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. चिंचोली (भुयार) शिवारात यंदा सहा ठिकाणी गुऱ्हाळाच्या चुलवणी पेटल्या आहेत. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे.
सध्या बाजारपेठेत गुळाला ४,५०० ते ५,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. चकाकी असलेल्या रसायनमिश्रित गुळाला मागणी असली, तरी आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने रसायनविरहित सेंद्रिय गुळाला मोठी पसंती मिळत आहे. मध्यंतरी साखर कारखानदारी वाढल्याने आणि मजुरांचे पुणे-मुंबईकडे स्थलांतर झाल्याने गुन्हाळे कमी झाली. मात्र, उमरगा भागातील गुळाला गोळ्या व विस्कीट (कन्फेक्शनरी) उद्योगातून मोठी मागणी असते अशी माहिती गुऱ्हाळ मालक अशोक पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यांत यंदा उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढले असले, तरी पावसाअभावी मध्यंतरी उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दर्जेदार उसाची उपलब्धता काहीशी कमी झाली असून, त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर दिसून येत आहे. साखर कारखान्यापेक्षा गुळातून अधिक नफा मिळत असला, तरी गेल्या सात-आठ वर्षांत मजुरांच्या कमतरतेमुळे गुन्हाळांची संख्या घटली होती. मात्र अधिक नफ्यामुळे शेतकरी पुन्हा गुऱ्हाळांकडे वळू लागले आहेत.
गुऱ्हाळाच्या एका कढईसाठी सव्वा टन ऊस लागतो, यातून साधारण ९०० लिटर रस निघतो आणि किमान दोन क्विंटल (१८ ते २० डाग) गूळ तयार होतो. चिंचोली (भुयार) येथील शेतकरी संजय गायकवाड यांनी सांगितले की, स्वतः गूळनिर्मिती उद्योग सुरू केल्याने त्यांना जवळपास १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. खर्च वजा जाता अकरा ते बारा लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हाळामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा, मजुरांना चांगली मजुरी आणि जनावरांसाठी वाड्याच्या रूपात उत्तम वैरणही उपलब्ध होते. त्यामुळे शेतकरी त्यास प्राधान्य देत आहेत.


















