धाराशिव : शॉर्टसर्किटने दोनशे एकरांवरील ऊस खाक, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

धाराशिव : अंतरगाव (ता. भूम) आणि साकत (ता. परंडा) परिसरात लागलेल्या भीषण आगीत दोनशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील ऊस जळाला. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत ऊस पिकासह केळीच्या बागा, ठिबक सिंचन संच, विहिरीवरील सौरऊर्जा यंत्रणा, पाइप, मोटारी आणि अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यातच आगीच्या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर दुहेरी संकट ओढावले आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, साकत परिसरात दुपारी अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आग झपाट्याने पसरली. आणि अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. परंडा येथील अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी येऊन आग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. जोरदार वाऱ्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या पिकांसह ठिबक सिंचन व सौरऊर्जा यंत्रणेचे पंचनामे करावेत. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here