धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हर्षवर्धन गुंड (वय २१) या तरुणाने नोकरीच्या मागे न धावता एआयद्वारे आधुनिक शेती करून एक एकरातून तब्बल १०३ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. उसाच्या पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढते, हे लक्षात घेऊन त्याने बारामती कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. केंद्राच्या पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी होत २२ ऑगस्ट २०२४ रोजी एक एकरासाठी सुमारे ९० हजार रुपये खर्च करून एआय प्रणाली कार्यान्वित केली. या तंत्रज्ञानाद्वारे खत, पाणी, कीड व रोग व्यवस्थापनाबाबत नियमित सूचना मिळाल्याने त्याने शेतीचे काटेकोर नियोजन केले. परिणामी, ज्या जमिनीतून यापूर्वी ३० ते ५० टनांपर्यंत उत्पादन मिळत होते, त्याच जमिनीतून यंदा तब्बल १०३ टन उसाचे उत्पादन त्याने घेतले.
१ एकराच्या प्लॉटमध्ये हवामान आधारित एआय तंत्रज्ञान मृद सेन्सरसह बसविले. यातून हर्षवर्धनला दररोज तापमान, पर्जन्यमानाची माहिती मोबाइलवर मिळू लागली. सेन्सरद्वारे पिकाला किती पाण्याची आवश्यकता आहे, मातीला नत्र, स्फुरद, पोटॅशची किती गरज आहे, हे कळू लागल्याने खताची मात्रा ठरवता आली. कीड रोग व्यवस्थापनासाठी 3 माहिती मिळाल्याने पिकाची वाढ चांगली होण्यास मदत झाली.हर्षवर्धन शेती करतानाच शिक्षणही घेत आहे. तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत तो शेतीशी संबंधितच बॅचलर इन अॅग्रिकल्चरचे धडे गिरवतोय. त्याने दैनिक ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, हवामानानुसार पारंपरिक शेतीमध्ये आवश्यक असलेले बदल करावेच लागणार आहेत. तंत्रज्ञानाचीही आवड असल्याने कुतूहल निर्माण केलेल्या एआयचा वापराचा प्रयोग केला. एकाच एकरातून २ लाखांचे उत्पन्न वाढले.


















