१५ ऑक्टोबरच्या साखर हंगामाबाबत शेतकरी संघटनांशी चर्चा होणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यात येणार आहे. शासनाची भूमिका संघटनांसमोर मांडल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सणासुदीच्या काळात राज्यात साखरेची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे साखरेची उपलब्धता सुरळीत ठेवण्यासाठी सरकारला गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ऊस दरावरून शेतकरी संघटनांचा विरोध

ChiniMandi WhatsApp Channel

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ऊस दराच्या मुद्द्यावरून काही शेतकरी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी शासन शेतकरी संघटनांशी चर्चा करूनच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.मुश्रीफ म्हणाले, “गेल्या वर्षी शेतकऱ्यांना प्रतिटन ३,४०० रुपये ऊस दर देण्यात आला होता. काही ठिकाणी आणखी १०० रुपये देणे बाकी होते. अनेक कारखाने ही थकबाकी देत आहेत.”

साखरेची दरवाढ तात्पुरती होती

साखरेच्या वाढलेल्या दरावरून ऊस दर वाढविण्याची मागणी होत असल्यास त्याबाबत शेतकरी संघटनांशी चर्चा करावी लागेल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम आणि तात्पुरती होती. ही वाढ केवळ दोन दिवस राहिली आणि त्यानंतर साखरेचे दर पुन्हा कमी झाले. त्यामुळे या वाढलेल्या दराचा साखर कारखान्यांना फारसा आर्थिक फायदा झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.“साखरेच्या वाढलेल्या दराच्या आधारे ऊस दराची मागणी होत असेल, तर शेतकरी संघटनांसोबत बसून चर्चा करावी लागेल. वाढलेल्या साखरेच्या दराचा कारखान्यांना फारसा फायदा झालेला नाही, हे त्यांना समजावून सांगावे लागेल,” असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here