ब्राझीलमध्ये जगातील पहिले इथेनॉल इंजिन विकसित करण्यात आले आहे. हे इंजिन पूर्णपणे इथेनॉलवर चालेल आणि मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करेल. हा प्रकल्प ब्राझीलमधील पेर्नाम्बुको येथील सुआप II पॉवर प्लांटमध्ये उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध ऊर्जा कंपनी सुआप एनर्जी आणि एक प्रसिद्ध फिन्निश तंत्रज्ञान कंपनी वार्ट्सिला यांचा याच्या निर्मितीत सहभाग आहे. शास्त्रज्ञांनी विकसित केलेले हे महाकाय इंजिन पॉवर ग्रिडसाठी वीज निर्माण करण्यास सक्षम असेल. वार्ट्सिलाने ३२ एम नावाच्या एका विशेष इंजिनमध्ये बदल केले, जे केवळ ब्राझीलच्या उसापासून मिळवलेल्या इथेनॉलवर चालते. शास्त्रज्ञ आता त्याची चाचणी घेतील. त्याची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी हे इंजिन पुढील काही वर्षे चालवले जाईल. आतापर्यंत, इथेनॉलचा वापर फक्त कार आणि ट्रकसारख्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून किंवा मिश्रणाद्वारे केला जात होता. मात्र हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पॉवर ग्रिडमध्ये क्रांती घडवू शकते. इथेनॉलपासून वीज निर्माण केली जाईल.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनुसार (आयईए), २०३० पर्यंत जागतिक जैवऊर्जा उत्पादनात वेगाने वाढ होईल. परिणामी, या तंत्रज्ञानाचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. सौर पॅनेल आणि पवनचक्की यांच्या वीज निर्मितीला मर्यादा असते. जर सूर्यप्रकाश नसेल आणि वारा वाहत नसेल, तर ते निरुपयोगी ठरतात. यामुळे बॅटरी-आधारित साठवणूक प्रणाली ग्रीड सांभाळण्यासाठी खूप महाग ठरतात. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा शोध सुरू आहे. ब्राझीलने इथेनॉलचे उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता अनेक वर्षे खर्च केली आहेत. आता या नव्या आविष्काराची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सुआप एनर्जीचे तांत्रिक संचालक, जोसे फॉस्टिनो कॅंडिडो म्हणाले की, ब्राझील हा जगातील इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक असूनही, त्यापासून वीज निर्मिती करण्याच्या कल्पनेकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले गेले होते. या नवीन इंजिनमुळे इथेनॉलपासून वीज निर्मिती करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. सौर किंवा पवन ऊर्जा उपलब्ध नसतानाही, हे इथेनॉल इंजिन ग्रिडला अखंडपणे वीजपुरवठा करण्यास सक्षम असेल.


















