देशातील साखर उद्योगाला इथेनॉल उत्पादनामुळे आर्थिक स्थैर्य लाभल्याचे तज्ज्ञांचे मत

पुणे : इथेनॉल हे उसाचा रस, मळी, तांदूळ आणि मका यांसारख्या विविध कच्च्या मालापासून तयार केले जाते. मात्र इथेनॉलचे गुणधर्म मूळ कच्च्या मालापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. कारण, निर्मिती प्रक्रियेदरम्यान कच्च्या मालावर किण्वन (फर्मेंटेशन) प्रक्रियेसह अनेक प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) बाबत समाज माध्यमांवर काही व्यक्तींकडून उसाचा रस थेट पेट्रोलमध्ये मिसळला जात असल्याचे चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. हा दावा निराधार आहे. इंधनात मिसळण्यासाठी वापरले जाणारे इथेनॉल प्रस्थापित औद्योगिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाते.

पेट्रोलमध्ये मिसळण्यापूर्वी ते कठोर गुणवत्ता मानकांची पूर्तता करते. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल मिश्रणाचा निर्णय भारतासाठी महत्त्वाचा ठरत आहे असे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे. इथेनॉलकडे शेतीसाठी एक नवीन संधी म्हणून पाहिले पाहिजे. देशाच्या इंधन आणि ऊर्जा क्षेत्राला पुरवठा केल्यामुळे ऊस, मका आणि तांदूळ यांसारख्या पिकांना पारंपरिक कृषी बाजारपेठांच्या (मंड्यांच्या) पलीकडे एक अतिरिक्त बाजारपेठ मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले.

ChiniMandi WhatsApp Channel

ठोंबरे यांनी इथेनॉलविषयक आपली भूमिका मांडताना सांगितले की, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाची अंमलबजावणी देशासाठी दिलासादायक ठरली आहे. भारतातील इथेनॉल मिश्रणाची प्रक्रिया इंधनाच्या गुणवत्तेबाबतच्या कठोर मानकांचे पालन करते. प्रत्यक्ष वापरापूर्वी त्याची कसून चाचणी केली जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांचे इंजिन खराब होते, असा केला जाणारा प्रचार हा दिशाभूल करणारा असून, त्यामागे राजकारण असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे महाराष्ट्र राज्यप्रमुख संजय कोले यांनी केला आहे. अलीकडे समाज माध्यमांवर वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता.

याबाबत ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (बीपीसीएल) स्पष्ट केले, की पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरले जाणारे फ्युएल-ग्रेड इथेनॉल किण्वन (फर्मेटेशन) आणि ऊर्ध्वपातन (डिस्टिलेशन) प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. या प्रक्रियेमुळे अंतिम उत्पादनातील उरलेली साखर पूर्णपणे काढून टाकली जाते. इथेनॉल मिश्रणामुळे देशाच्या हजारो कोटी रुपयांच्या परकीय चलनात बचत होत असून प्रदूषणातही मोठी घट होत आहे. नवी दिल्लीतील कृषी भवनात ४ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देशभरातील शेतकरी नेत्यांनी इथेनॉल उत्पादनाच्या विस्ताराला जोरदार पाठिंबा दर्शविला. त्यांनी या उपक्रमाचे वर्णन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने एक मोठी संधी म्हणून केले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here