पुणे : महाराष्ट्रात ऊस पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. मात्र, इतर रोगांच्या तुलनेत चाबूक काणी हा महत्त्वाचा रोग आहे. चाबूक काणी या रोगाचे प्रमाण ऊस पिकात विभागानुसार कमीअधिक असल्याचे जाणवते. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ भागात रोगाचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण सरासरी १० टक्क्यांपर्यंत आहे. अनेक ऊस जाती काणी रोगास कमीअधिक प्रमाणात बळी पडतात. लागण पिकापेक्षा खोडवा पिकात या रोगाचे प्रमाण जास्त आहे. रोगाच्या प्रादुर्भाव एकरी ऊस आणि साखरेचे उत्पादन यामध्ये येणारी घट टाळण्यासाठी वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे, असा सल्ला मांजरी बुद्रूक (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस रोगशास्त्र विभागातील डॉ. गणेश कोटगिरे, डॉ. ए. डी. कडलग, जी. ई. आत्रे यांनी दिला आहे. काणी रोगामुळे लागण व खोडवा ऊस पिकाचे उत्पादन अनुक्रमे २९ व ७० टक्क्यांपर्यंत घटल्याची नोंद आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
सद्यस्थितीत मराठवाड्यात चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. को ८६०३२ आणि व्हीएसआय ०८००५ या दोन्ही जातींमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे. हंगामनिहाय रोगाची तीव्रता कमीअधिक असते. उन्हाळ्यात या रोगाचे प्रमाण जास्त असते. खोडव्यात रोगाची तीव्रता जास्त दिसते पर्यायाने खोडवा पिकाच्या उत्पादनात घट येते. उसाच्या उत्पादनावर व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे शेतकऱ्यांनी बेणेमळ्यातील रोगमुक्त बेणे निवडावे. शिफारशीत, रोगप्रतिकारक अथवा मध्यम रोगप्रतिकारक जाती लागणीसाठी निवडाव्यात. लागणीपूर्वी देण्यास अझाक्झिस्ट्रॉबीन अधिक टेब्युकोनॅझोल १ मिलि किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे १० ते २० मिनिटे बेणेप्रक्रिया करावी. नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगट बेटे मुळासहित काढावीत व जाळून नष्ट करावीत. लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बेणेप्रक्रिया करावी. उन्हाळ्याच्या दिवसांत पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. खोडवा पिकाची मशागतीची कामे वेळेत करावीत. शेतात पाचट आच्छादन करावे असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.


















