जीएम तांदळाबाबत तज्ज्ञांकडून सावधानतेचा इशारा, देशातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती

बंगळुरू : केंद्र सरकारकडून जनुकीय सुधारित (GM) तांदळाला प्रोत्साहन देण्याच्या हालचालींवर संशोधक, तज्ज्ञ आणि कृषी कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. GM तांदळाच्या प्रसारामुळे देशातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आणि भरून न येणारे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ‘डेक्कन हेरॉल्ड’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, अलीकडील माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेली ‘पूसा DST राईस 1’ ही GM तांदळाची जात सध्या बियाणे वाढविण्याच्या टप्प्यात आहे. आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना लागवडीसाठी हे बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.

GM-मुक्त भारत आघाडीची केंद्राकडे चिंता

ChiniMandi WhatsApp Channel

GM-मुक्त भारत आघाडीने केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून या तंत्रज्ञानाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जनहितासाठी काम करणाऱ्या नागरिकांच्या या राष्ट्रीय व्यासपीठाने जनुक संपादन तंत्रज्ञानाच्या अचूकतेपासून ते बियाणे सार्वभौमत्वावर होणारा परिणाम, पर्यावरणीय धोके आणि पारंपरिक तांदळाच्या वाणांवरील संभाव्य परिणाम अशा आठ विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आघाडीच्या म्हणण्यानुसार, जनुक संपादनासाठी वापरली जाणारी साधने अनपेक्षित स्वरूपाचे डीएनए नुकसान घडवून आणू शकतात.आघाडीने वैज्ञानिक संशोधनांचा हवाला देत म्हटले आहे की, कृषी जैवतंत्रज्ञान उद्योगाकडून CRISPR-Cas सारख्या जनुक संपादन साधनांद्वारे जनुकांमध्ये अचूक बदल करता येतात आणि केवळ अपेक्षित बदलच होतात, असा दावा केला जातो. मात्र, वाढत्या वैज्ञानिक पुराव्यांमधून या तंत्रज्ञानाच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे.

जैवसुरक्षा चाचण्यांबाबतही प्रश्न

आघाडीने म्हटले आहे की, जनुक संपादनाच्या दोन तंत्रांवरील नियमन शिथिल केल्यामुळे अनिवार्य जैवसुरक्षा चाचण्यांची आवश्यकता दूर झाली आहे. त्यामुळे ‘पूसा DST राईस 1’ तसेच ‘कमला’ या वाणांना जैवसुरक्षा चाचण्यांशिवाय बाजारात आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.जनुक संपादन हे जनुकीय बदलाच्या (Genetic Modification) प्रक्रियेचाच एक भाग असून, त्याला स्वतंत्र श्रेणी मानता येणार नाही, असेही आघाडीने म्हटले आहे.GM-मुक्त भारत आघाडीच्या कविता कुरुगंटी यांनी लिहिलेल्या या पत्राला संशोधक, वनस्पती प्रजनन तज्ज्ञ, निवृत्त शास्त्रज्ञ आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींसह 97 जणांनी समर्थन दिले आहे.

तांदळाच्या वाणांवरील संशोधनाच्या आकडेवारीवर प्रश्न

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) प्रसिद्ध केलेल्या या दोन तांदळाच्या वाणांशी संबंधित संशोधनाच्या आकडेवारीच्या वैज्ञानिक विश्वासार्हतेवरही आघाडीने प्रश्न उपस्थित केला आहे. ही बाब वैज्ञानिक फसवणुकीच्या स्वरूपाची असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे.आघाडीच्या मते, GM तांदळामुळे केवळ भारताच्या बियाणे सार्वभौमत्वालाच धोका नाही, तर देशाच्या तांदूळ निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो.

भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश असून, पश्चिम आशिया आणि आखाती देशांमधील सेंद्रिय उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या महत्त्वाच्या बाजारपेठा भारत गमावू शकतो, अशी चिंता पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.आघाडीने पुढे म्हटले आहे की, जनुक संपादित तांदळाच्या वाणांचे फायदे ज्या प्रकारे सांगितले जात आहेत ते प्रत्यक्षात सिद्ध करण्यासाठी त्यांची सखोल आणि व्यापक चाचणी होणे आवश्यक आहे. तसेच या चाचण्यांमधील सर्व माहिती सार्वजनिक करून व्यापक वैज्ञानिक परीक्षणासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

 

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here