सांगली : केंद्र सरकारने २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन ३,६५० रुपयांची एफआरपी जाहीर केली आहे. त्यापुढील प्रत्येक एक टक्क्यासाठी ३५६ रुपये निश्चित केले आहेत. ज्या कारखान्यांचा साखर उतारा हा ९.५ टक्केपेक्षा कमी असेल, तेथे प्रतिटन ३,३८३ एफआरपी देय असणार आहे. कृषिमूल्य आयोग उसाची एफआरपी अर्थात ऊस दर जाहीर करते. केंद्र सरकारकडून मागील वर्षापेक्षा प्रतिटन १०० रुपयांची वाढ केल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मात्र बेस देखील १०.२५ टक्के कायम ठेवल्याने या वाढीव एफआरपीचा फायदा होण्याबाबत शंकाच आहे. किमान एफआरपीसाठी बेस कपातीचा पॅटर्न कायम राहिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. उसाच्या उत्पादन खर्चाच्या आकडेवारीबाबतही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. ऊसदरात किमान तीनशे ते साडेतीनशे रुपयांनी वाढ शेतकऱ्यांना अपेक्षित होती. उसाचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक, वाढलेले रासायनिक खतांचे दर पाहता, यामध्ये अजूनही बाढ होणे गरजेचे आहे. तशी मागणीदेखील होत आहे.
केंद्र सरकारने उसाचा उत्पादन खर्च हा १,८२० रुपये प्रतिटन गृहित धरलेला आहे. हा आकडा २,५०० पेक्षा देखील जादा असल्याचे शेतकरी सांगतात. एफआरपीमधील वाढ तुटपुंजी आहे. सलग तिसऱ्या वर्षी दहा टक्केचा बेस वाढवून तो सव्वादहा टक्के केला आहे. साखरेच्या किमान ९.५ टक्के साखर उताऱ्यावरील प्रत्येक ०.१ पॉईंटच्या उताऱ्याला अधिमूल्य निश्चित केले जाते. आता हा बेस १०.२५ टक्के करण्यात आला आहे. सरासरी साखर उतारा गृहित धरल्याने राज्यात शेतकऱ्यांना अधिमूल्य कमी मिळत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या उच्च साखर उतारा विभागातील शेतकऱ्यांना यातून कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. सांगली जिल्ह्यातच दरवर्षी साधारणतः ९५ लाख टनाच्या घरात उसाचे गाळप होते. बेस रेटमुळे प्रतिटन ५११ रुपयांचे नुकसान धरले, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल ४८५ कोटी ४५ लाख रुपयांचा फटका बसणार आहे. यावरून एफआरपीची दरवाढ किती फसवी आहे हे लक्षात येऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता ऊस उत्पादनाचा खर्च हा ४० ते ४५ टक्के वाढला आहे. रासायनिक व शेणखताचे तसेच बी-बियाणे, मशागतीचे दर वाढलेत. प्रतिटन उसाची तोडणी वाहतूक वाढली आहे. हा खर्च एफआरपीमधून कपात होणार आहे.


















