सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट नं. १६ च्या वतीने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन १५० रुपयांचा अंतिम हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यामुळे गत हंगामातील उसाचा एकूण अंतिम दर प्रतिटन ३,५५० रुपये झाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
याबाबत बोलताना बोत्रे-पाटील म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन कारखान्याने अंतिम हप्त्यापोटी प्रतिटन १५० रुपये अदा केले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गत हंगामात जिल्ह्यातील उच्चांकी ऊसदर देण्याचा मान कारखान्याला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्यावर शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास आणि सहकार्य ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. याची जाणीव ठेवून आगामी गळीत हंगामातही शेतकऱ्यांच्या उसाला योग्य व उच्चांकी दर देण्यास प्राधान्य राहणार आहे. तसेच ऊसबिले आणि ऊस वाहतूकदारांची देयके वेळेत अदा करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध आहे.शेतकऱ्यांचा विश्वास हीच आमची ताकद असून, त्यांचे आर्थिक हित हेच कारखान्याचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याच भूमिकेतून ओंकार साखर कारखाना भविष्यातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.


















