डी. वाय. पाटील कारखान्यातर्फे दिवाळीपूर्वी ५० रुपये अंतिम हप्ता : आमदार सतेज पाटील

अणदूर : डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याने गेली अनेक वर्षे एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. कारखान्याकडील उपपदार्थ प्रकल्पाच्या माध्यमातून एफआरपीपेक्षा जादा दर देणे शक्य होत आहे. २०२२-२३ मध्ये कारखान्याची एफआरपी २९०३ रुपये होती, मात्र कारखान्याने उसास ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. आता अंतिम हप्ता ५० रुपयांनुसार एकूण ऊस दर ३०५० रुपये आहे. तो दिवाळीपूर्वी दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केली.

असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले की, साखर कारखान्यातर्फे या हंगामात एफआरपीपेक्षा १४७ रुपये जादा दर दिला जात आहे. ऊस विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याची भूमिका कारखान्याची आहे. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. साखर कारखान्याने आगामी हंगामात ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्यास गळितास पाठवावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सभासदांनी सभेपुढील सर्व विषयांना मंजुरी दिली. कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. ऊस विकास अधिकारी सुनील पाटील यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा आढावा घेतला. व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, दत्तात्रय पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, धैर्यशील घाटगे आदी उपस्थित होते. एकनाथ लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव नंदू पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here