गरुड भरारी : साताऱ्यातील ऊसतोड मजुराच्या लेकीची भारतीय हॉकी संघात निवड

सातारा : जिल्ह्यातील ऊसतोड करणाऱ्या दामप्त्याच्या लेकीने कौतुकास्पद कामगिरी केलीय. दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावच्या नकुसा व सदाशिव आटपाडकर या ऊसतोड मजूर दाम्पत्याची मुलगी काजल आटपाडकर हिची भारतीय हॉकी संघात निवड झाल्याने माण तालुक्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. नकुसा आणि सदाशिव या ऊसतोड मजूर दाम्पत्याच्या पोटी जन्म घेऊन जन्मापासूनच दुःख, दारिद्र्य, कष्ट सोसत मोठी झालेल्या काजल आटपाडकरने भारतीय हॉकी संघात आपले स्थान निश्चित केले आहे. निवडीपर्यंतचा तिचा प्रवास हा अनेकांना थक्क करणारा आहे.

वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील सदाशिव आटपाडकर यांना वडिलोपार्जित फक्त अर्धा एकर जमीन आहे. मात्र, कायम दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करून पाण्याची तहान भागवावी लागते, तर शेतीला पाणी कुठून येणार? असा प्रश्न पडत असल्याने आपल्या पाच मुली व दोन मुलांचा सांभाळ कसा करायचा, हा यक्ष प्रश्न नकुसा व सदाशिव या दाम्पत्यासमोर होता. मुलांचे संगोपन व भविष्य घडवण्यासाठी त्यांनी ऊसतोड मजूर म्हणून अनेक वर्षे घराला टाळे ठोकून मुले इतरांकडे ठेवून परमुलखात ऊसतोड मजुरी केली.

ChiniMandi WhatsApp Channel

काजल ही लहानपणापासून जिद्दी होती. तिच्यातील गुण ओळखून चंद्रकांत जाधव व संगीता जाधव या दाम्पत्याने तिला पाटलाची वस्ती येथील मराठी शाळेत तिसरीपर्यंतचे शिक्षण देण्याची सोय केली. तिच्यातील खेळाचे प्रावीण्य ओळखून शिक्षकांनी तिला क्रीडा प्रबोधिनीच्या चाचणी स्पर्धेत उतरवले. तिची निवड झाल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथील बालेवाडी येथे प्रवेश मिळाला व तिथूनच तिच्या खेळाचा प्रवास सुरू झाला. काजलने आपल्याकडे असलेली क्षमता ओळखत हॉकीचा सराव सुरू केला. या खेळामध्ये तालुका, जिल्हा, राज्यपातळीवर तिने चमकदार कामगिरी करून दाखवली. तसेच, तिला हॉकी स्पर्धेसाठी विविध ठिकाणी संधी मिळाली. तिने जर्मनीतही चमकदार कामगिरी केल्याने तिची नुकतीच भारतीय हॉकी संघात निवड झाली आहे.

दै. ‘पुढारी’शी बोलताना काजलच्या आई नकुसा आटपाडकर म्हणाल्या, मी व माझे पती दोघेही अशिक्षित असून, आम्हाला वडिलोपार्जित अर्धा एकर जमीन आहे. पाणी नसल्याने शेतीतून कसलेही उत्पन्न येत नाही. सात मुलांचा सांभाळ करण्यासाठी आम्हाला ऊसतोड मजुरी करावी लागली. अशा बिकट परिस्थितीत माझ्या काजल या मुलीला चंद्रकांत जाधव व संगीता जाधव या दाम्पत्याने त्यांच्याजवळ ठेवून तिला शिक्षणाची गोडी लावली. तिचे खेळातील गुण ओळखून तिला विविध स्पर्धांमध्ये सहभागी केले असता तिने या संधीचे सोने करून दाखवले. तिच्या या यशामध्ये त्यांचाही वाटा खूप मोठा असून, माणदेशी फाऊंडेशनचे प्रभात सिन्हा यांनीही तिला लॉकडाऊनच्या काळात सर्वतोपरी मदत केल्याने त्यांचाही तिच्या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here