फ्लेक्स-फ्यूएल वाहनांना प्रोत्साहन देण्याची सरकारची तयारी, आता ८५ टक्के इथेनॉलवर धावणार वाहने!

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या पुरवठा मार्गामधील वाढती अस्थिरता आणि ऊर्जा सुरक्षेबद्दलच्या नव्याने निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार पर्यायी इंधन धोरणांचा आढावा घेत आहे. भारतीय रस्त्यांवर फ्लेक्स फ्युएल आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाची एक उच्चस्तरीय बैठक लवकरच होणार आहे. केंद्र सरकार फ्लेक्स-फ्युएल वाहनांना (ई-८५) वेगाने प्रोत्साहन देण्याची तयारी करत आहे. देशभरात ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना, प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखले जात असून फ्लेक्स-फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योगांकडून सरकारवर जीएसटी दर कमी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. सद्यस्थितीत भारतात २०२५ मध्ये इथेनॉल उत्पादन २३ अब्ज लिटरपर्यंत पोहोचले आहे. यावर्षी ३० अब्ज लिटरचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाहन उद्योगाने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी आवश्यक असलेले इंजिन तंत्रज्ञान, इंधन वितरण प्रणाली आणि देशभरातील रिटेल पंप नेटवर्कचा अभाव ही भारतीय वाहन उद्योगाची सर्वात मोठी चिंता आहे असे उद्योगातील एका जाणकाराने सांगितले. सध्या पेट्रोल इंजिन असलेल्या कार किंवा बाईकमध्ये ८५% इथेनॉल थेट वापरता येणार नाही. यासाठी फ्लेक्स-फ्युएल वाहनाची आवश्यकता असते. ब्राझील, थायलंड, फ्रान्स, कॅनडा, स्वीडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आदी देशांत याचा वापर केला जात असला तरी वाहन उद्योगात तशा पद्धतीच्या बदलांची गरज आहे. काही कंपन्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांवर काम करत आहेत. मात्र, ही वाहने सामान्य पेट्रोल वाहनांपेक्षा महाग असतात आणि सध्या त्यांची किंमत ईव्हीच्या जवळपास आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मते युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता भारताने भविष्यात १०० टक्के इथेनॉल मिश्रणाचे ध्येय ठेवावे. भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘फ्लेक्स-फ्युल’ आणि पर्यायी इंधन हाच एकमेव मार्ग आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here