‘हालशुगर’ मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करणार; दररोज १० हजार टन ऊस गाळपाचे नियोजन : माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले

बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा आगामी गळीत हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे उपलब्ध उसाचे कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले असून, यंदा दररोज १० हजार टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दररोज दोन लाख लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.

हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या ४० व्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आले. संचालक श्रीकांत बन्ने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याला नुकताच प्लॅटिनम पुरस्कार मिळाला असून, डिस्टिलरी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे हा सन्मान मिळाल्याचे जोल्ले यांनी सांगितले. यंदा साखरेला चांगला दर मिळत असल्याने मोलॅसिसचा केवळ पारंपरिक वापर न करता त्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. कारखान्याच्या आर्थिक हिताला प्राधान्य देऊन कोणत्या पर्यायातून अधिक फायदा होईल, याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे जोल्ले यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

३० सप्टेंबरपूर्वी कारखाना सज्ज करा

कामगारांना दर महिन्याच्या १० तारखेला वेतन दिले जात असून, मागील वर्षाप्रमाणे यंदाही बोनस देण्यात येणार असल्याचे जोल्ले यांनी सांगितले.“३० सप्टेंबरपूर्वी गळीत हंगामासाठी कारखाना पूर्णपणे सज्ज ठेवा. यंदा कोणतेही स्टॉपेज न घेता गळीत हंगाम यशस्वी करा,” अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.याशिवाय कारखान्यात सल्फरमुक्त साखर निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार खोत म्हणाले की, यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संचालकांनी एकजुटीने व प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून गाळप हंगाम सुरळीत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी म्हणाले की, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचा राज्यात तसेच देशात नावलौकिक वाढत आहे. एकेकाळी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या कारखान्याला अण्णासाहेब जोल्ले यांनी आर्थिक पाठबळ देऊन पुन्हा उर्जितावस्था मिळवून दिली. इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याला आर्थिक बळ मिळाले आहे. बिरेश्वर संस्थेनेही मोठी प्रगती केली असून, कारखान्यानेदेखील लवकरच आदर्श वाटचाल करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास ज्योतीप्रसाद जोल्ले, सुनील पाटील, संचालक आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, रामगोंडा पाटील, समित सासणे, पवन पाटील, सुकुमार पाटील, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, शरद जंगटे, सुहास घुगे, विनायक पाटील, वैशाली निकाडे, राजेंद्र शाह, महालिंग कोठीवाले, आर. एल. चौगुले, आनंद यादव, भरत नसलापुरे, देवाप्पा देवकाते, कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक जयवंत भाटले यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here