हिंगोली : ऊस दरवाढीसाठी जनआंदोलन उभारण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

हिंगोली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ बैठका आणि आश्वासनांचा खेळ आता पुरे झाला. वर्षभर राबूनही घामाला योग्य दाम मिळत नसेल, तर हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. २७ नोव्हेंबर रोजी ऊस दरासाठीचे आंदोलन ही केवळ लढ्याची सुरवात असेल. जोपर्यंत न्याय्य दर मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची ही एकजूट मागे हटणार नाही, अशी घोषणा शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून येत्या २७ नोव्हेंबर रोजी तालुक्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. शासनाने व साखर कारखान्यांनी तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र संघर्षाचा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, आरपीआय आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना यांसह विविध सामाजिक संघटनांनी ऊस दरवाढीसाठी एकत्रित पुढाकार घेतला आहे.

ऊस उत्पादनासाठी लागणारी मशागत, खते, कीटकनाशके, पाणी, वीज, तोडणी व वाहतूक आदींवरील खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र कारखानदारांकडून चांगला दर मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळावा आणि उसाला न्याय्य दर जाहीर व्हावा, या मागणीसाठी वसमत तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. उसाला समाधानकारक दर मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली. बैठकीला स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे, शिवसेनेचे सुनील काळे, डॉ. पार्डीकर, तानाजी भोसले, तुषार जाधव, संदीप माटेगावकर, अनिल कदम, नवनाथ कुन्हे, सतीश जाधव, रावसाहेब अडकिने, दिनेश हनुमंते, विजयकुमार इंगळे, भास्कर सूर्यवंशी, राहुल करवंदे, गोरख चव्हाण, ऋषिकेश बर्वे आदी उपस्थित होते. संयोजन जुनेद पठाण यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here