जिल्हा बँक शेतकऱ्यांची म्हणता, तर १२ साखर कारखान्यांकडे हजारो कोटींची कर्जे कशी? : प्रताप ढाकणे यांचा सवाल

अहिल्यानगर : ‘जिल्हा बँक शेतकऱ्यांची म्हणता, तर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांकडे हजारो कोटी रुपयांची कर्जे कशी?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रताप ढाकणे यांनी उपस्थित केला. बँकेच्या कर्जवाटपातील मोठा हिस्सा मोजक्या साखर कारखान्यांकडे आहे, बँकेने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे होते. यावेळी व्हाइस चेअरमन माधव काटे, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शेलार, संचालक डॉ. प्रकाश घनवट, सुरेश होळकर, त्रिंबक चेमटे, भाऊसाहेब मुंडे, आयुब शेख, रणजित घुगे, जनरल मॅनेजर रामेश गर्जे, पोपट केदार, तीर्थराज घुंगरड, प्रवीण काळुसे, सुधाकर खोले, अंबादास दहिफळे आदी उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, “जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांकडे सुमारे २ हजार ७८० कोटी रुपयांचे कर्ज आहे. बँकेचा पैसा कोणाच्या घरून आलेला नाही, तो शेतकऱ्यांचा आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या आणि कारखाने विकले तरी कर्जाची परतफेड होणार नाही, अशा परिस्थितीतील कारखान्यांना पुन्हा कर्ज का दिले जाते?” केदारेश्वर कारखान्याने प्रत्येक वेळी कर्जासाठी प्रस्ताव सादर करूनही त्याला नकार का दिला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सत्ता येते आणि जाते; मात्र समाज आणि राज्य कायम राहते. चार वेळा आमदारकीची निवडणूक लढलो आणि पराभूत झालो, तरी निवडणुकीला घाबरत नाही. मतांसाठी लाचार होणारा मी माणूस नाही, असे ढाकणे यांनी सांगितले स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी संघर्षातून केदारेश्वर साखर कारखाना उभा केला. हे संस्थेचे वैभव मोठ्या संघर्षातून निर्माण झाले असून ते टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here