नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२७ आणि २०२८ या दोन्ही वर्षांत भारताचा आर्थिक विकासदर ७ टक्के राहण्याचा अंदाज IMF ने वर्तवला आहे. मात्र, ऊर्जा आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमती तसेच भू-राजकीय अनिश्चिततेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिरता अधिक नाजूक होत असल्याचा इशाराही संस्थेने दिला आहे.
IMF ने ऑक्टोबर २०२६ च्या ‘जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवाल (World Economic Outlook) २०२६’ मध्ये जागतिक आर्थिक विकासदर ३.१ टक्के आणि २०२७ मध्ये ३.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. IMF च्या मते, जागतिक अर्थव्यवस्था अद्याप विविध धक्क्यांचा सामना करत टिकून आहे; मात्र ही स्थिरता अधिक नाजूक आणि देशागणिक असमान होत चालली आहे. जागतिक महागाईचा दर २०२६ मध्ये वाढून ४.७ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. ऊर्जा आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमती हे त्यामागील प्रमुख कारण असेल. त्यानंतर २०२७ मध्ये महागाईचा दर काहीसा कमी होऊन ४.१ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.
भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे IMF ने नमूद केले आहे. अपेक्षेपेक्षा मजबूत आर्थिक गती, देशांतर्गत मागणीतील स्थिरता आणि सेवा क्षेत्रातील भक्कम कामगिरी यांमुळे भारताच्या विकासाला चालना मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२७ आणि २०२८ या दोन्ही वर्षांसाठी भारताचा विकासदर ७ टक्के राहण्याचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेतील परिस्थिती सर्व देशांसाठी सारखी नाही. मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम, कच्च्या मालाच्या किमती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीची स्थिती यानुसार विविध देशांवर ऊर्जा संकटाचा परिणाम वेगवेगळा होत असल्याचे IMF ने स्पष्ट केले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेने वारंवार निर्माण झालेल्या संकटांचा सामना केला, यामागे ऊर्जा पुरवठ्यातील लवचिकता, इतर देशांमधील वाढलेले उत्पादन, उपलब्ध साठ्यांचा वापर आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांकडे वाढलेला कल ही प्रमुख कारणे असल्याचे IMF ने सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयशी संबंधित गुंतवणुकीमुळेही आर्थिक घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला आधार मिळाला आहे. तथापि, हे आधार पुरेसे ठरणार नाहीत, अशी शक्यता IMF ने व्यक्त केली आहे. ऊर्जा साठे कमी होणे, नव्याने भू-राजकीय संकटे निर्माण होणे आणि अनिश्चितता दीर्घकाळ कायम राहणे यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणि आर्थिक व्यवहारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील धोके अधिक प्रमाणात नकारात्मक बाजूकडे झुकलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास किंवा अधिक तीव्र झाल्यास ऊर्जा आणि अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या राहू शकतात. परिणामी, महागाईचा दबाव पुन्हा वाढून आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.जागतिक व्यापाराच्या वाढीचा वेग २०२६ मध्ये मंदावेल आणि २०२७ मध्ये स्थिर होईल, असा अंदाजही IMF ने व्यक्त केला आहे. आयात शुल्क, उत्पादन साखळ्यांमधील बदल आणि तंत्रज्ञानाशी संबंधित व्यापारातील सातत्यपूर्ण वाढ या घटकांचा जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वित्तीय तूट, देशांतर्गत मागणीतील मर्यादित समतोल, तंत्रज्ञान क्षेत्रामुळे होणारा भांडवलाचा प्रवाह आणि विविध देशांमधील मागणीच्या स्वरूपातील फरक यांमुळे जागतिक आर्थिक असमतोलात मध्यम कालावधीत केवळ मर्यादित घट होईल, असेही अहवालात म्हटले आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याबाबत बाजाराच्या अपेक्षांमध्ये मोठा बदल होण्याचा धोकाही IMF ने अधोरेखित केला आहे. असे झाल्यास गुंतवणूक कमी होऊ शकते, शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते आणि वित्तपुरवठ्याच्या अटी अधिक कठीण बनू शकतात.
जगभरातील सरकारांसमोर सार्वजनिक कर्जाची वाढती पातळी आणि कर्जावरील जास्त खर्च ही आव्हाने आहेत. त्यामुळे भविष्यातील आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी सरकारांकडे उपलब्ध असलेली आर्थिक मोकळीक मर्यादित होत आहे. अशा परिस्थितीत देशांनी आर्थिक धोरणांसाठी राखीव क्षमता पुन्हा मजबूत करावी आणि भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन IMF ने केले आहे.















