सोलापुरात लोकसभेला ऊसतोड मजुराचा मुलगा रिंगणात!

सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांच्याऐवजी ‘माळशिरस’चे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. सोलापुरात दाखल झालेल्या सातपुते यांचे भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. सोलापुरात आपली लढत माजी मुख्यमंत्र्याची कन्या विरूध्द ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी होणार असल्याचा दावा आ. सातपुते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात ते रिंगणात उतरले आहेत.

आमदार सातपुते यांचे छत्रपती संभाजी महाराज चौकात जोरदार स्वागत झाले. त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्यास आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. शेकडो कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने जाताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. यावेळी बोलताना आमदार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मी उपरा नसून माझे आई-वडील दोघांनी याच सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांसाठी ऊसतोड मजूर म्हणून काम केले होते. याचा अर्थ आपण सोलापूरचेच आहोत, असा दावा सातपुते यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here