नवी दिल्ली : भारताचे ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पेट्रोलमध्ये एथेनॉल मिश्रण वाढवण्यासाठी केंद्र सरकार वेगाने पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांत एथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचा विस्तार करत सरकारने अनिवार्य 20 टक्के (E20) मिश्रणाच्या उद्दिष्टापलीकडे जात, निकट भविष्यात 30 टक्क्यांपर्यंत ऐच्छिक मिश्रण, तसेच दीर्घकालीन पातळीवर 85 टक्के आणि 100 टक्के एथेनॉल मिश्रण साध्य करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय विमान इंधनातही एथेनॉल मिश्रणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयांमुळे अन्नसुरक्षा आणि जलसुरक्षा याबाबत नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत. बिझनेस टुडे मासिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, तज्ज्ञांचे असे मत आहे की एथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर तांदूळ, मका आणि ऊस यांसारख्या पिकांचा वापर केल्यास देशातील अन्नव्यवस्था आणि जलस्रोतांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
एथेनॉल उत्पादनात धान्याने उसाला टाकले मागे…
उद्योगाशी संबंधित आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना पुरविण्यात येणाऱ्या एथेनॉलमध्ये आता पारंपरिक ऊसाधारित एथेनॉलपेक्षा धान्याधारित एथेनॉलचा वाटा अधिक झाला आहे.एथेनॉल सप्लाय इयर (ESY) 2017-18 मध्ये धान्याधारित एथेनॉलचा वाटा शून्य होता. तो वाढून 2022-23 मध्ये 59.7 टक्के आणि 2025-26 मध्ये 72.4 टक्के झाला आहे. सध्या एकूण एथेनॉल उत्पादनात मक्याचा वाटा 45.2 टक्के, तर तांदळाचा वाटा 27.2 टक्के आहे.
आर्थिक सर्वेक्षणानेही व्यक्त केली चिंता…
2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणात या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. एथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे शेतकरी कडधान्ये, तेलबिया आणि इतर अन्नधान्य पिकांऐवजी मक्याच्या लागवडीकडे वळत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पीक पद्धतीत बदल दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. याचा दीर्घकालीन परिणाम अन्नसुरक्षा आणि अन्नधान्यांच्या किमतींवर होऊ शकतो, असा इशाराही सर्वेक्षणात देण्यात आला आहे.
पाण्याचा प्रचंड वापर ही सर्वात मोठी समस्या…
एथेनॉल उत्पादनासंदर्भातील सर्वात मोठी चिंता म्हणजे या पिकांची अत्यंत जास्त पाणी वापरण्याची क्षमता.अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या एका अभ्यासानुसार :1 लिटर ऊसाधारित एथेनॉल निर्मितीसाठी सुमारे 3,630 लिटर पाणी लागते. 1 लिटर मका-आधारित एथेनॉलसाठी 4,670 लिटर पाणी खर्च होते. 1 लिटर तांदूळ-आधारित एथेनॉल निर्मितीसाठी तब्बल 10,790 लिटर पाणी लागते. तज्ज्ञांच्या मते, जलसंकटाचा सामना करणाऱ्या भारतासारख्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वापरणाऱ्या पिकांवर आधारित एथेनॉल धोरण दीर्घकालीन दृष्टीने शाश्वत मानता येणार नाही.
उद्योग समाधानी, पण तज्ज्ञ सावध…
ग्रेन एथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सी. के. जैन यांनी सांगितले की, पूर्वी केवळ ऊसावर अवलंबून राहिल्यामुळे एथेनॉल उद्योगाला कच्च्या मालाची कमतरता भासत होती. आता धान्याधारित एथेनॉल उत्पादन वाढल्यामुळे उद्योगाकडे पुरेसे फीडस्टॉक आणि उत्पादन क्षमता उपलब्ध असून 30 टक्क्यांहून अधिक मिश्रणाचे उद्दिष्ट सहज साध्य करता येईल.
दुसरीकडे, जल आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.सोसायटी फॉर प्रमोटिंग पार्टिसिपेटिव्ह इकोसिस्टम मॅनेजमेंटचे तज्ज्ञ के. जे. जॉय यांच्या मते, एथेनॉल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर शेतीजमिनीचा वापर केल्यास अन्नसुरक्षा आणि जलसुरक्षा दोन्हींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऊर्जा धोरण आखताना अन्न आणि पाणी यांना केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे आहे.
तर टेरी स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे गोपाल सारंगी यांनी सांगितले की, अन्नसुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा यांच्यात समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामध्ये जमीन, पाणी, पशुखाद्य आणि अन्नधान्य यांच्यात स्पर्धात्मक मागणी निर्माण होते.
एथेनॉलमुळे झालेले फायदे सरकारने मांडले…
सरकारच्या म्हणण्यानुसार, एथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे शेतकरी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2014-15 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एथेनॉल मिश्रणामुळे : शेतकऱ्यांना 1.5 लाख कोटी रुपयांचे जलद पेमेंट मिळाले. देशाची 1.7 लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली. 8.69 कोटी टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट झाली. 2.89 कोटी टन कच्च्या तेलाच्या आयातीला पर्याय उपलब्ध झाला.
ऊर्जा आणि अन्नसुरक्षेमध्ये संतुलन आवश्यक…
तज्ज्ञांचे मत आहे की, भारताने ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करताना अन्नसुरक्षा आणि जलसुरक्षेशी तडजोड करू नये. एथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची निवड, पीक धोरण आणि संसाधनांचे नियोजन करताना स्थानिक परिस्थिती, जलउपलब्धता आणि अन्नधान्य गरजा यांचा विचार करणे आवश्यक आहे.


















