नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता २२ रेल्वे आस्थापनांमध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या सुमारे ५०० किलो एलपीजी आणि २,५०० लिटर डिझेलऐवजी पाइपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूचा (PNG) वापर करणार आहे. यासाठी उत्तर रेल्वेने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. आयजीएल ने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या करारानुसार सुरुवातीला दररोज सुमारे ३,००० स्टँडर्ड क्युबिक मीटर (SCMD) PNG वापरले जाण्याचा अंदाज आहे.पायाभूत सुविधा आणि जोडणीचा विस्तार झाल्यानंतर येत्या काही वर्षांत ही मागणी वाढून ८,००० ते १०,००० SCMD पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.या करारामध्ये दिल्ली, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर येथील रेल्वे आस्थापनांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल PNG ड्राइव्ह 3.0’ अंतर्गत संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये नैसर्गिक वायूचा वापर वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पहिल्या टप्प्यात २२ रेल्वे आस्थापनांना पीएनजी पुरवठा
पहिल्या टप्प्यात निश्चित करण्यात आलेल्या २२ ठिकाणी पीएनजीचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये दिल्ली सराय रोहिल्ला, जुनी दिल्ली, आनंद विहार टर्मिनल, हजरत निजामुद्दीन आणि नवी दिल्ली येथील रेल्वेच्या यांत्रिक लॉन्ड्रींचा समावेश आहे. या ठिकाणी बॉयलर चालवण्यासाठी पीएनजीचा वापर केला जाणार आहे.याशिवाय रेल्वे अधिकाऱ्यांची विश्रामगृहे, बेस किचन, रनिंग रूम, कर्मचाऱ्यांची विश्रामगृहे तसेच गार्ड आणि प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) यांच्यासाठी असलेल्या लॉबींनाही या करारांतर्गत पीएनजी पुरवठा केला जाणार आहे. IGL च्या अधिकृत कार्यक्षेत्रांमध्ये पीएनजी पायाभूत सुविधांचा विस्तार झाल्यानंतर या भागीदारीचा आणखी विस्तार केला जाणार आहे. यामध्ये अजमेर, बांदा, रेवाडी आणि मुझफ्फरनगर या क्षेत्रांचाही समावेश आहे.
रेल्वेच्या ऊर्जा खर्चात होणार मोठी बचत
या प्रसंगी उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुष्पेश रमन त्रिपाठी म्हणाले की, या करारामुळे भारतीय रेल्वेच्या ऊर्जा खर्चात मोठी बचत होण्यास मदत होईल. भविष्यात रेल्वे रुग्णालये आणि रेल्वे वसाहतींनाही पीएनजी जोडणी देण्याची रेल्वे प्रशासनाची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.IGL चे अध्यक्ष शुभंकर सेन म्हणाले की, या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात एलपीजी ऐवजी नैसर्गिक वायूचा वापर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे इंधन आयातीवरील अवलंबित्व आणि त्यासंबंधित अनुदानाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.
भारतीय रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये एलपीजी ऐवजी पीएनजी वापरण्याच्या व्यापक बदलासाठी हा उपक्रम मार्ग मोकळा करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.IGL चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर यांनी या भागीदारीला भारतीय रेल्वे आणि शहर गॅस वितरण कंपन्यांमधील सहकार्याचे एक आदर्श मॉडेल असल्याचे म्हटले.दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी IGL चे संचालक (वाणिज्यिक) मोहित भाटिया यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.या उपक्रमामुळे इंधन हाताळणीची प्रक्रिया अधिक सोपी होईल, पुरवठ्याची विश्वासार्हता वाढेल आणि रेल्वे आस्थापनांमध्ये स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.















