नवी दिल्ली : इराणमधील युद्धामुळे वाढलेले इंधन दर आणि खतांच्या तुटवड्यामुळे आशियातील शेतकरी लागवडीचे क्षेत्र कमी करत आहेत. त्यासोबतच निर्माण होत असलेल्या एल निनोचा परिणामही वाढल्याने यंदा जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या तांदळाच्या उत्पादनावर दबाव येण्याची शक्यता आहे.तांदूळ हा जागतिक अन्नसुरक्षेचा केंद्रबिंदू आहे आणि पुरवठ्यातील अगदी किरकोळ अडथळ्यांमुळेही अनेक देशांवर परिणाम होतो, किंमती वाढतात आणि विशेषतः आशिया व आफ्रिकेतील ग्राहकांच्या घरगुती अर्थसंकल्पावर ताण येतो.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) एप्रिलमध्ये 2025-26 मध्ये तांदूळ उत्पादन 2% ने वाढून विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र इराण युद्धाचे परिणाम थायलंड व व्हिएतनामसारख्या प्रमुख निर्यातदार देशांतील तसेच फिलिपाइन्स आणि इंडोनेशियासारख्या आयातीवर अवलंबून देशांतील शेतकऱ्यांवर दिसून येत आहेत. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे इंधन आणि खतांचा पुरवठा बाधित झाला आहे, जो जागतिक बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
दक्षिण-पूर्व आशियातील लहान शेतकऱ्यांवर एल निनोमुळे वाढणारे उष्ण आणि कोरडे हवामानही अतिरिक्त ताण निर्माण करत आहे. FAO चे मुख्य अर्थतज्ज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी सांगितले की, वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी कमी प्रमाणात खत आणि इतर साधनांचा वापर करत आहेत, त्यामुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला जागतिक पुरवठा अधिक तंग होण्याची शक्यता आहे.
2008 मध्ये प्रमुख निर्यातदारांनी घातलेल्या निर्बंधांमुळे तांदळाचे दर दुपटीने वाढून सुमारे 1000 डॉलर प्रति टन झाले होते आणि अनेक देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अलीकडेच 2022-23 मध्येही भारताच्या निर्यात निर्बंधांमुळे पुरवठा कमी होऊन दर वाढले आणि घाबरून खरेदी करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या तांदळाच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः आशियात पॉलिप्रोपिलीन पिशव्यांची कमतरता, वाहतुकीसाठी ट्रकची उपलब्धता कमी आणि जहाज वाहतुकीत अडथळे यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे.
दक्षिण-पूर्व आशियात सध्या कापणी होत असलेल्या पिकांचे उत्पादन खतांच्या तुटवड्यामुळे आणि कोरड्या हवामानामुळे कमी झाले आहे, तर पुढील हंगामात आणखी घट होण्याची शक्यता आहे. भारत, थायलंड आणि फिलिपाइन्स जून-जुलैमध्ये मुख्य पिकांची लागवड करतात, तर व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्ये दुसऱ्या हंगामाची पेरणी सुरू आहे.शेतकऱ्यांच्या मते, खत आणि इंधन दर वाढल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे खताचा वापर अर्ध्यावर आणावा लागला आहे. फिलिपाइन्समध्येही अशीच परिस्थिती असून काही शेतकरी लागवड कमी करण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियामध्ये खतांची कमतरता नसली तरी एल निनोमुळे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मार्च ते मे या कालावधीत लागवडीखालील क्षेत्र 10.6% ने घटून 3.85 दशलक्ष हेक्टरपर्यंत येण्याची शक्यता आहे, तर उत्पादन 11.12% ने घटून 20.68 दशलक्ष टन होऊ शकते. तथापि, मागील काही वर्षांतील चांगल्या उत्पादनामुळे जागतिक साठा सध्या पुरेसा आहे। जगातील सर्वात मोठा निर्यातदार भारताकडे सुमारे 42 दशलक्ष टन तांदळाचा साठा आहे, जो जागतिक साठ्याच्या सुमारे पाचव्या भागाएवढा आहे.
तांदळाच्या किंमती सध्या स्थिर असल्या तरी लवकरच वाढण्याची शक्यता आहे. जर होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर पुढील काही आठवड्यांत परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.


















