जळगाव : संभाजीनगर येथील साखर उपसंचालक कार्यालयात मंत्री समितीच्या निर्णयानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मधुकर सहकारी साखर कारखान्याकडून उस उत्पादकांच्या बिलातून प्रति टन ५० रुपये कपात केलेली ठेव रक्कम परत करण्यासाठी पहिला हप्ता वाटपाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या बैठकीत ३ हजार शेतकऱ्यांच्या ३ कोटी रुपयांच्या ठेवी परत करण्याची यादी मंजूर करण्यात आली. तसेच, पहिला हप्ता देण्यासाठी धनादेश देण्यात आला.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, उपसंचालक भारती ठाकूर, कारखाना अवसायक बलसाणे उपस्थित होते. कारखान्याने २०११-१२ ते २०१५-१६ या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बिलातून प्रति टन ५० रुपये ठेव म्हणून कपात केली होती. एकूण ७२८.४५ लाख रुपयांच्या ठेवीपैकी ५ टक्के म्हणजेच ४०.६५ लाख रुपये मूळ रक्कम परत करणे शक्य असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाने मान्य केले होते. त्यानुसार हा निर्णय झाला. उर्वरित १० कोटी रुपये व्याजासह लवकरात लवकर देण्यासाठी आरआरसीद्वारे प्रक्रिया करण्याचे आश्वासन उपसंचालकांनी बैठकीत दिले.















