जळगाव : जिल्ह्यात ऊस उत्पादनात आघाडीवर असलेल्या चोपडा तालुक्यात उसाचे लागवड क्षेत्र घटत आहे. पांढरीमाशीचा उपद्रव आणि अन्य समस्या यामुळे लागवडीसंबंधी अडचणी आल्याची माहिती आहे. उसाचे क्षेत्र घटल्याने आगामी हंगामात स्थानी साखर कारखान्याला उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. चोपडा तालुक्यात यंदा सुमारे दीड हजार हेक्टरवर उसाचे पीक असल्याचा अंदाज आहे. पुढील वर्षी चोपडा साखर कारखान्यास गाळपासाठी अन्य भागातून ऊस आणावा लागेल.
काही भागांत उसाचे उत्पादन अत्यंत कमी झाल्याने ऊस पीक परवडत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी नवीन वर्षाच्या लागवडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी येत्या गळीत हंगामासाठी तालुक्यात गाळपासाठी येणारा ऊस कमी झाला आहे. उतारा, उत्पादन कमी झाल्याने ऊस परवडत नसल्याची स्थिती आहे. ऊस उत्पादकांना एकरी आठ ते बारा टन एवढेच ऊस उत्पादन येत आहे. यात उत्पादन खर्च वाढला आहे. उसाऐवजी शेतकरी भाजीपाला, केळी आदी पिकांकडे वळले आहेत.


















