पुणे : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कारखान्यावरील सत्तारुढ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व कायम राहण्याची चिन्हे आहेत. कारखाना निवडणुकीच्या रिंगणातील शेळगाव ऊस उत्पादक गटातील तीन जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एक जागा अशा चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. भिगवण गट आणि ‘ब’ वर्ग सहकारी संस्था व पणन मतदारसंघातील जागाही बिनविरोध होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. निवडणुकीसाठी दाखल ५१ अर्जापैकी छाननीत ११ अर्ज बाद झाल्याने ४० अर्ज वैध ठरले आहेत. छाननीनंतर अनेक गटांतील लढत तीव्रता कमी झाल्याचे दिसत आहे.
कारखान्याच्या ‘ब’ वर्ग सहकारी संस्था व पणन मतदारसंघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने या जागेवरही बिनविरोधची शक्यता आहे. निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने पूर्ण पॅनेल उभे केले. दुसरीकडे, प्रमुख विरोधक निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहिल्याने पाटील गटाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. शेळगाव गटातील तीन जागांसाठी रोहित राजेंद्र गायकवाड, बिभीषण नलवडे आणि अतुल शिंगाडे यांचेच अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी अमोल जाधव यांचा अर्ज वैध राहिल्याने ही जागा बिनविरोध होणार आहे. भिगवण गटातील तीन जागांसाठी चार अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पराग जाधव आणि त्यांच्या मातोश्री प्रमिला जाधव या दोघांचेही अर्ज असल्याने या गटातील उमेदवारीचे समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. माघारीनंतर या गटातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

















