जालना : मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर याच्या वतीने उसतोड कामगारांच्या मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडावा आणि मोबाईलचा मर्यादित वापर व्हावा या उद्देशाने क्रीडा साहित्य वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी कृषिभूषण विजयआण्णा बोराडे, गटशिक्षणाधिकारी राजेश जोश, पोलिस निरीक्षक आदिनाथ ढाकणे, मुख्याध्यापक राजेश तौर, आश्वजित जाधव, एकनाथ राउत हे उपस्थित होते. यावेळी काही शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कार्यक्रमात मुलांनी विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच काही ठिकाणी मैदानी खेळांचे आयोजन करून वातावरण अधिक आनंददायी करण्यात आले.
ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील लहान मुला-मुलींना विविध प्रकारचे क्रीडा साहित्य क्रिकेट बॅट, बॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, दोरीउडी, कबड्डी साहित्य आदींचे वितरण करण्यात आले. साहित्य मिळाल्याने मुलांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन केले. खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. नियमित खेळामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते आणि संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण यांचा विकास होतो, असे त्यांनी सांगितले. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून खेळाकडे प्रोत्साहित करावे असे आवाहन पालकांना करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो आणि भविष्यात ते विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करू शकतात, असे सांगण्यात आले.


















