जालना : ऊसतोड मजुरी आणि ऊस वाहतुकीच्या दरात वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार, वाहनमालक तसेच संबंधित घटकांनी एकत्र येत बुधवारी घनसावंगी येथे ट्रॅक्टर रॅली काढली. नवीन बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीनंतर तहसीलदार रमेश पागोटे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ऊसतोड मजुरी आणि वाहतूक दर वाढविण्याची मागणी
ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये योग्य वाढ करावी, तसेच ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांच्या भाडेदरात वाढ करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. वाहनमालकांना मिळणाऱ्या कमिशन आणि मोबदल्यातही योग्य वाढ करण्यात यावी. डिझेल, टायर, सुटे भाग आणि वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च लक्षात घेऊन वाहतुकीचे दर निश्चित करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय, ऊसतोड कामगार, मुकादम, वाहनचालक आणि वाहनमालकांची देयके वेळेवर अदा करावीत. कामगार व चालकांसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, विमा संरक्षण आणि मूलभूत सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन
दरम्यान, उसाला प्रतिटन ५ हजार रुपये अंतिम दर जाहीर करावा आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ५ हजार रुपये अंतिम दर जाहीर करावा, तसेच जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांसह गोदावरी नदीतून पाण्याची पाच आवर्तने देण्याचे नियोजन जाहीर करून तातडीने पाणी सोडावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. या वेळी समर्थ साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील, व्यवस्थापकीय संचालक बी. टी. पावसे आणि जलसंपदा विभागाचे भानुदास शिरसाठ यांना आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


















