बंगळूरू : साखरेची एमएसपी वाढविणे, उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करणे यांसह पाच प्रमुख मुद्द्यांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. शिवकुमार यांनी १९ ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात यांनी उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादकांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उत्तर कर्नाटकातील ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब झाला आहे. शेतात उभ्या असलेल्या उसाचे वजन आणि साखरेचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनामुळे जनजीवनही विस्कळीत होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिवकुमार यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि रखडलेला ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाला घेराओ घालण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलने केल्याचा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांनी १७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील कित्तूर येथे जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि पदयात्रा मागे घेण्याचे आवाहन केले, आहे असे सांगितले. मात्र, प्रमुख मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने केंद्राकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. राज्य सरकारने साखर कारखान्यांमधील वजनातील अनियमितता रोखण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती लागू केली. राज्यातील सर्व ८१ कार्यरत कारखान्यांनी अॅनालॉगऐवजी डिजिटल लोड सेल प्रणाली स्वीकारली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.


















