कर्नाटक : साखरेची साठेबाजी शोधण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आस्थापनांवर छापेमारी

बेळगाव : बाजारातील साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मर्यादा लागू केली आहे. त्यानुसार देशभरातील साखर व्यापाऱ्यांना एका ठिकाणी कमाल ४,००० क्विंटल साखर साठवता येणार आहे. तसेच, प्राप्त झालेला साठा ३० दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. तसेच साखरेच्या किमतीत अनावश्यक वाढ होऊ नये यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने बेळगाव शहरात व्यापारी आस्थापनांवर छापा टाकून साखर साठ्याची तपासणी सुरू केली आहे.

केंद्र सरकारने २८ जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साखर साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. या आदेशाची माहिती देणारे पत्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने १० ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा व विभागीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून सोमवारी (ता. २४) शहराच्या मुख्य बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आदेशातील सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ करण्याच्या प्रयत्नांना आळा बसण्याची शक्यता आहे. बाजारात नियमित पुरवठा कायम ठेवण्याबरोबरच साखरेच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीसाठी हे निबंध लागू केले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर विभागाची पथके बाजारपेठांमध्ये साखर साठ्याची तपासणी करण्यासाठी उतरली आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here