कर्नाटक : ऊसदर आंदोलनाचा गळीत हंगामाला फटका, शेतकऱ्यांना कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा

बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे ऊसतोडणीचे काम ठप्प झाले आहे. धारवाड येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आंदोलनकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेत्यांची भेट घेऊन ऊसदरवाढीच्या मागणीवर सकारात्मक आश्वासन दिले. केंद्र सरकारने या प्रश्नावर विचार करण्यासाठी पुढाकार घेतल्याने शेतकरी नेत्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऊसतोडणीचा हंगाम लवकर सुरू होण्याची आशा निर्माण झाली असून कामगारांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाविना बसून राहावे लागत असल्याने ऊसतोड कामगारांचे डोळे आता साखर कारखाने सुरू होण्याकडे लागले आहेत.

जिल्ह्यातील विविध भागांत दरवर्षी ऊसतोडणीच्या हंगामात महाराष्ट्रातून हजारो कामगार आपल्या कुटुंबीयांसह दाखल होतात. ऊस तोडणीच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, यंदा ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी संघटनांनी आंदोलने केल्याने तोडणीच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. परिणामी, महाराष्ट्रातील बीड, जालना यांसह विविध जिल्ह्यांतून रोजगारासाठी बेळगाव जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. आता आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात साखर कारखान्यांचे गाळप कधी सुरू होणार आणि ऊसतोडणीला मुहूर्त कधी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ऊसतोडणी लवकर सुरू झाल्यास रोजगाराचा प्रश्न मार्गी लागून कामगारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here