कर्नाटक : तोडणी, वाहतूक खर्च वगळून ३,६५० रुपये ऊस दर देण्याची तीन शेतकरी संघटनांची मागणी

बेळगाव : गेल्यावर्षी राज्यातील साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन ३,५५० रुपये दर दिला. यंदा त्यात १०० रुपयांची वाढ केली असली तरी थेट प्रतिटन ३,६५० रुपये एफआरपी देऊन तोडणी-ओढणीचा खर्च साखर कारखाना प्रशासनाने करावा, अशी मागणी तीन शेतकरी संघटनांनी केली आहे. जयकिसान शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत संघटनेचे नेते रमेश पाटील आणि कार्याध्यक्ष शीतल बागे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिटन ३,६५० रुपये दरासह तोडणी-ओढणी खर्च साखर कारखान्यांनी उचलावा, अशी मागणी केली. अन्यथा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जयकिसान शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने २०२६-२७ या साखर हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून उसाची एफआरपी प्रतिटन ३,६५० रुपये निश्चित केली आहे. हा दर १०.२५ टक्के साखर उताऱ्यावर आधारित असणार आहे. हा नवीन दर साखर उताऱ्यावर आधारित असून, त्यापेक्षा प्रत्येक ०.१ टक्का वाढीसाठी प्रतिक्विंटल ३.५६ रुपये प्रोत्साहन दिले जाणार आहे. उताऱ्यात घट झाल्यास त्याच प्रमाणात कपात होईल. ९.५ टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेल्या साखर कारखान्यांसाठी कोणतीही कपात न करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान ३३८.३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे. यावेळी शिवगोडा पाटील, शीतल वैगुडे, शिवगोंडा पाटील, रामू मत्तीवडे, अशोक गुदगत्ते, मनोज कोन्नपण्णावर, बापू हंपन्नावर, सिद्धार्थ नाईक, हणमंत उप्पार, कुमार नाईक, संजय माळी, राजू पाटील, जितेंद्र टाकळे, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here