नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देशातील सर्व पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल आणि ई-२० पेट्रोल, हे दोन्ही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावेत. तसेच ई-२० पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आपने नागरिकांसाठी एक ऑनलाइन याचिका सुरू केली; ज्याद्वारे लोक ई-२० पेट्रोलबाबतचे आपले अनुभव शेअर करू शकतात. त्यांनी जनतेला मायलेजमधील घट आणि इतर समस्यांशी संबंधित आपल्या चिंता मांडण्याचे आवाहन केले. लोकांनी मांडलेल्या सर्व चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडल्या जातील. पंतप्रधान मोदी आपल्याला लवकरच भेटीची वेळ देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सध्या देशभरात इथेनॉलमिश्रित (ई-२०) पेट्रोलच्या वापरावरून वाहनधारक तीव्र चिंता व संताप व्यक्त करीत आहेत. लोकांच्या चिंतांवर चर्चा करण्यासाठी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.
देशातील सर्व पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल व इथेनॉल मिश्रित पेट्रोल हे दोन्ही पर्याय उपलब्ध असावेत. जर एखाद्या व्यक्तीला शुद्ध पेट्रोल घ्यायचे असेल तर त्याला तो पर्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांना ई-२० पेट्रोल घ्यायचे आहे, त्यांनाही ती सुविधा उपलब्ध असावी, असे केजरीवालांनी पत्रात नमूद केले. देशात ई-२० पेट्रोलचे दर प्रचंड आहेत. ते कमी करावेत. इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे सामान्य पेट्रोलच्या तुलनेत गाड्यांचे मायलेज कमी मिळते. म्हणूनच त्याची किंमतदेखील कमी असायला हवी. आपच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंप तसेच सर्व्हिस स्टेशनवर जाऊन ग्राहकांशी संवाद साधावा. त्यांच्या अनुभवांचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियात शेअर करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले.

















