सातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून उसाची बिले थकीत आहेत. या प्रश्नावर आता किसान काँग्रेस आक्रमक झाली असून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा काँग्रेस कमिटी आणि संलग्न सर्व घटकांच्या वतीने शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी 1 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत काँग्रेस भवनात ‘जनसुनावणी’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी दिली. इनामदार म्हणाले की, या जनसुनावणीत शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांबाबतच्या विविध तक्रारींची नोंद घेऊन त्यावर कायदेशीर तसेच आंदोलनात्मक दिशा ठरवली जाईल.
उसाच्या बिलांच्या देयकात होणारा विलंब, वजनातील तफावत आणि बेकायदेशीर कपातीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.घाम गाळून पिकवलेल्या उसाचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि किसान काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र येणार असून शेतकऱ्यांनीही संघटित होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


















