कोल्हापूर : ऊस दराबाबत तोडग्यासाठी दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार

कोल्हापूर : गोकुळ सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच महायुतीचे जिल्ह्यातील सर्व नेते आणि पराभूत तसेच काही विजयी उमेदवार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात एकत्रित आले. यावेळी जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम विना अडथळा लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घ्यावी, असा आग्रह काही साखर कारखानदारांनी धरला. याबाबत पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत गोकुळमधील पराभवासह आता होत असलेल्या पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक आमदार या निवडणुकीबाबत चर्चा झाली. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अमल महाडिक, इतर नेते उपस्थित होते. यावेळी कुंभी कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रदीप नरके यांनी साखर कारखाने सुरू झाले पाहिजेत. काही प्रमुखांचे कारखाने सुरू राहतात. इतरांचे कारखाने सुरू करू दिले जात नाहीत. त्यामुळे यातून नाराजी आणि संघर्ष वाढणार असल्याचे सांगितले. दुष्काळी स्थितीत उसाला पाणी नाही, त्यामुळे कारखाने तातडीने सुरू होण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घ्यावी, असे सुचविले. त्यावर ही बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या दोन दिवसांत होईल असे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here