कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सह. साखर कारखान्याचा कारभार सन २०१४ पासून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे कारखान्यावरील २५० कोटीच्या कर्जाला तेच जबाबदार आहेत. कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिकाच न काढता त्यांनी संचालक मंडळाला घेऊन लक्ष्मी मंडपात समोरासमोर यावे, असे आव्हान कारखान्याचे माजी संचालक शिवाजी खोत यांनी पत्रकार परिषदेत दिले. गेल्या १५ वर्षात ऊस उत्पादक सभासदांचे सुमारे १ हजार कोटींचे नुकसान झाले. सध्या कारखान्यावर ३०० कोटींचे कर्ज, १५० कोटींची देणी आहेत असा आरोप त्यांनी केला. कर्जाचा बोजा वाढवून कारखाना विक्रीला काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवाजी खोत म्हणाले की, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सभासदांनी गेल्या दोन निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलकडेच सत्ता दिली. चार दिवसांपूर्वी मुश्रीफ यांचा कारखान्याच्या कामगारांनी थकित ८ कोटींची देणी दिल्याबद्दल सत्कार केला. त्यावेळी हंगाम चांगले न गेल्यामुळेच कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला असून कारखान्याची श्वेतपत्रिका काढायला आपण तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. मात्र कारखान्याने २०२१ ते २०२६ या काळातील सेवानिवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटीची केवळ २५ टक्केच रक्कम दिली. १५ वर्षे थकित प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम कारखान्याच्या नफ्यातून नव्हे तर कर्जातून भरली आहे. मध्यंतरी डॉ. प्रकाश शहापूरकरांवरील ३० कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारखान्याची राज्यभर बदनामी झाली. अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी शहापूकरांकडून रक्कम वसूल करण्याचे आश्वासन वार्षिक सभेत दिले होते, त्याचे काय झाले ? असा सवालही खोत यांनी केला.


















