कोल्हापूर : अन्नपूर्णा शुगरकडून विनाकपात प्रतिटन ४००२ रुपयांचा दर जाहीर; संस्थापक संजय घाटगे यांची माहिती

कोल्हापूर : कागल तालुक्यातील केनवडे येथील अन्नपूर्णा शुगरने चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकपात प्रतिटन ४००२ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थापक संजय घाटगे यांनी दिली. याबाबत बोलताना संजय घाटगे म्हणाले, की आर्थिक अडचणी असतानाही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत हा दर जाहीर करण्यात आला आहे. ऊस उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, ही कारखान्याची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन विनाकपात ४००२ रुपये प्रतिटन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. साखर उद्योगाचा शेतकरी हा मुख्य आधार असून त्याचे आर्थिक हित जपणे ही आमची जबाबदारी आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांना शक्य तितका चांगला दर देण्याचा प्रयत्न राहील.

कार्यकारी संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला संपूर्ण ऊस अन्नपूर्णा शुगरला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.दरम्यान, अन्नपूर्णा शुगर हा खांडसरी प्रकल्प असल्याने पारंपरिक साखर कारखान्यांना लागू असणारे नियम या प्रकल्पाला लागू होत नाहीत. तसेच कारखान्यात साखरेव्यतिरिक्त अन्य उपपदार्थांची निर्मिती केली जात नाही. सहवीज निर्मिती किंवा इतर पूरक प्रकल्पही उपलब्ध नाहीत. अशा मर्यादित सुविधांमध्येही कारखान्याने विनाकपात प्रतिटन ४००२ रुपये दर जाहीर करून ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.या बैठकीस संचालक दिनकर पाटील, दत्तोपंत वालावलकर, एम. बी. पाटील, राजेश भराडे, तानाजी पाटील, मल्हारी पाटील, के. के. पाटील आणि विश्वास दिंडोर्ले उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here