कोल्हापूर : दुष्काळाचा ऊस रोपवाटिकांना फटका, रोपे विक्रीत पाच पटींनी घट

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमधून सातारा, बारामती, पुणे, सांगली, आटपाडी, पंढरपूर, सांगोला यांसह कर्नाटक आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर रोपे पाठवली जातात. यंदा मात्र दुष्काळामुळे या बाजारपेठांतील मागणी जवळपास ठप्प झाली. दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यभरातून ग्राहकांची वर्दळ असणाऱ्या रोपवाटिका आता ओस पडल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवडीचे संपूर्ण गणित बिघडले. शेतात उभ्या पिकाला पाणी देण्याची भ्रांत असताना नवीन लागवडीचे धाडस शेतकरी करत नसल्याचे चित्र आहे. पाण्याची खात्री नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन पुढे ढकलले. याचा थेट परिणाम रोपांच्या बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत महिन्याला सुमारे एक लाख रोपांची विक्री होत होती. यंदा हा आकडा थेट २० हजारांपर्यत घसरला. विक्रीत तब्बल ८० टक्क्यांची म्हणजेच पाचपट घट झाली. रोपे खराब होण्याची शक्यता आहे.

सध्या रोपवाटिकांमध्ये शेतकऱ्यांकडून नवीन आणि कोवळ्या रोपांनाच पसंती दिली जात आहे. जुनीच रोपे जात नसल्याने नव्याने रोपे तयार करण्याचे धाडस रोपवाटिका चालक करत नसल्याचे चित्र आहे. आधीच तयार केलेली रोपे आता मोठी झाली. काही रोपे कमरेइतकी वाढली आहेत. नदीकाठच्या काही भागांतच तुरळक लागणी सुरू आहेत. ऊस लागवडीचे नियोजन ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी रोप खरेदीकडे पाठ फिरवली. लाखो रुपयांची गुंतवणूक करून, प्रसंगी कर्ज काढून तयार केलेली रोपे विक्रीविना पडून राहिली आहेत. काही ठिकाणी रोपे उपटून फेकण्याची वेळ आली. उत्पन्नाचे साधन बंद, मात्र पाणी, वीज आणि मजुरीचा खर्च सुरूच, अशा दुहेरी संकटात रोपवाटिका चालकांची आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र आहे. रोप वाटिकांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले. त्यामुळे जादा वाढ झालेली रोपे नियमित दरापेक्षा निम्याहन कमी किमतीने द्यावी लागत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here