धाराशिव : जिल्ह्यात दुष्काळामुळे ऊस तोडणीवेळी हार्वेस्टरचा वापर मर्यादित करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

धाराशिव : साखर कारखान्यांनी चालू ऊस गाळप हंगामात हार्वेस्टरचा (यंत्राचा) वापर मर्यादित ठेवून किमान ६० ते ७० टक्के ऊसतोडणी ही मजुरांमार्फतच करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मजुरांकडून तोडणी झाल्यास उसाचे हिरवे वाढे सुस्थितीत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध होतील व स्थानिक मजुरांना रोजगार मिळून त्यांचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल. तसेच, एकूण ऊस लागवडीखालील ३० टक्के क्षेत्र हे चाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचेही आदेशात नमूद आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या पाार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अत्यंत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. या आदेशांमुळे कारखान्यांना ऊसतोडणीच्या पद्धतीपासून ते उपपदार्थांच्या वापरापर्यंत नियोजनात मोठे बदल करावे लागणार आहेत.

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा व मजुरांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्याची दखल घेत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळाच्या बिकट काळात ग्रामीण भागातील शेतमजुरांना रोजगाराचा दिलासा मिळण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या एकूण बगॅस व मळीच्या उत्पन्नापैकी प्रत्येकी ३० टक्के साठा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. या बगॅसचा वापर पूरक चारानिर्मिती व संभाव्य चारा छावण्यांसाठी, तर मळीचा वापर पशुखाद्य निर्मिती व सुक्या चाऱ्यावरील प्रक्रियेसाठी केला जाईल. प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय या राखीव साठ्याची बाहेर विक्री करता येणार नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दुष्काळ निवारणासाठी विशेष निर्देश दिलेले आहेत. त्याला अनुसरून विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ चे व्ही. व्ही. डोके यांनी सोमवारी जिल्ह्यातील १४ सहकारी व खासगी साखर कारखान्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here