कोल्हापूर : कनवाडमधील शेतकऱ्यांची जमीन म्हैसाळ बंधाऱ्याच्या बांधकामामुळे वाहून गेली होती. या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी ‘आंदोलन अंकुश’ संघटनेने आंदोलन उभारले. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. याबद्दल कनवाड येथील शेतकऱ्यांनी दर्गा चौकात झालेल्या कार्यक्रमात आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संघटनेच्या नियोजित ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेला १.५१ लाखांची देणगी सुपूर्द केली. खोनमीर बुखारी, संभाजी जाधव, मियासाहेब इनामदार, उदय होगले, वाजिद इनामदार, प्रकाश खाडे, सत्तार पटेल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी ‘आंदोलन अंकुश’ मार्फत उभारण्यात येत आलेल्या ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेला १.५१ लाखांची देणगी दिली. यावेळी ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘संघटनेच्या माध्यमातून आजवर शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळातदेखील आंदोलने केली जातील. शेतकऱ्यांनी संघटनेला पाठबळ द्यावे.’ यावेळी, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, इनामदार, राकेश जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. दस्तगीर इनामदार यांनी स्वागत केले. विकास शेषावरे यांनी आभार मानले.


















