कोल्हापूर : नवी दिल्लीच्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज या देशपातळीवरील संस्थेकडून येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता. २२) नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी कार्य केले असून, जवाहर कारखान्यासह दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बँक, इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिल आदी संस्थांचे संस्थापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. आवाडे यांना यापूर्वी फाय फाउंडेशनचा (इचलकरंजी) जीवन गौरव, आर. जी. गांधी श्रमण संस्कृती साधना (कोल्हापूर) संस्थेचा समाजभूषण, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनद्वारा वस्त्रोद्योग भूषण तसेच विष्णुआण्णा पाटील जीवन गौरव, किसन वीर साखर कारखान्याचा आबासाहेब वीर, दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टसचा (पुणे) ‘जीवन गौरव’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


















