कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर प्रतीच्या गुळाला उच्चांकी ५,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुजरातमधील कोल्डस्टोरेजमध्ये गुळाची साठवणूक कमी झाल्याने सध्या मागणी वाढली आहे; तर जिल्ह्यातील उत्पादनही कमी झाल्याने गुळाचे दर वाढले आहेत. गुळाच्या मूळ हंगामातही जितका दर मिळाला नाही, त्याहून अधिक दर सद्यस्थितीत गुळाला मिळत आहे. अन्न, औषधच्या कारवाईमुळे कोल्हापूरमधीलही काही गूळ उत्पादकांनी त्यांची गुऱ्हाळघरे बंद ठेवली. पण, उत्पादन पूर्णपणे थांबलेले नाही. ऊस हंगाम संपूनही गुऱ्हाळघरे सुरू आहेत. बुधवारी बाजार समितीमध्ये ३० किलोच्या ७,४५० गूळ ख्यांची आवक झाली आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर ते मार्च दरम्यान गूळ उत्पादन होते. कोल्हापूर बाजार समितीमध्ये येणारा बहुतांश गूळ गुजरातला पाठवतात. कोल्हापूरसह सांगली, कर्नाटकमधून येणार गूळ गुजरातमधील अहमदाबाद, म्हैसाना, हिम्मतनगर येथील कोल्डस्टोरेजमध्ये साठवला जातो. मार्च महिन्यानंतर स्टोरेजमधील गूळ बाहेर काढला जातो. मात्र, यंदा येथे गुळाचे स्टोरेज कमी झाल्याचे सांगितले जाते. पूर्वी केवळ गूळ हंगामातच गुळाचे उत्पादन घेतले जायचे. त्यामुळे हंगामात उत्पादित झालेला गूळ गुजरातमधील कोल्डस्टोरेजमध्ये मोठ्याप्रमाणात साठवला जायचा. पण, हे चित्र गेल्या दहा वर्षांत बदलले आहे. आता बारमाही गूळ उत्पादन होत असल्याने गूळ स्टोरेजमध्ये ठेवण्याचे प्रमाण कमी होत आहे.
मध्यंतरी पुणे जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकत कारवाई केली. याचा धसका गूळ उत्पादकांनी घेतला. कारवाईच्या भीतीने गुऱ्हाळ घरे बंद ठेवली. परिणामी, गुळाचे उत्पादन कमी झाले अन् तुटवडा निर्माण झाला. गुळाची मागणी वाढली असून, आवक कमी झाल्याने दर वाढले असल्याचे व्यापाऱ्यांमधून सांगण्यात येत आहे.

















