कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले येथे काही दुकानांना भेट देऊन साखरेच्या विक्रीदराची माहिती घेतली. साखर कारखान्यांकडून प्रति किलो ४७ ते ४८ रुपये दराने खरेदी केलेली साखर ग्राहकांना ५८ ते ६६ रुपये दराने विकली जात आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. साखरेचा आजचा बाजारभाव आणि कारखान्यांची निविदा पाहता, साखरेचा दर साधारण प्रति किलो ४७ ते ४८ रुपये आहे. मग या दरातील १० रुपये नेमके कुठे जातात, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. पुढील काही दिवसांत साखरेचा भाव प्रति किलो १०० रुपयांच्या आसपास जाईल. त्यामुळे उसाला चांगला दर मिळावा, अशी मागणी आहे, असेही शेट्टी म्हणाले.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, सध्या अनेक मोठ्या मार्टमध्ये साखर प्रति किलो ६६ रुपये दराने, तर किरकोळ दुकानांमध्ये ५८ रुपये दराने विकली जात आहे. आणखी किती नफा कमावणार? साखरेच्या विक्रीतील हा फरक नेमका कुठे जातो हे तपासण्याची गरज आहे. किरकोळ दुकानदारांना प्रति किलो ५७.५० रुपये दराने साखर मिळते आणि ते ५८ रुपये दराने विक्री करतात. म्हणजेच, केवळ ५० पैसे मार्जिन ठेवून किरकोळ दुकानदार साखर विकत आहेत. कारखानदार साखर प्रति किलो ४७ ते ४८ रुपये दराने विकत असताना साखरेला भाव मिळत नसल्याचे आणि उठाव नसल्याचे सांगत आहेत. जर शेतकऱ्यांनी शेतातील ऊस तसाच ठेवला, तर कारखाने उत्पादन घेऊ शकणार नाहीत. कारखान्यांनी साखरेचे उत्पादन घेतले नाही, तर बाजारात साखर उपलब्ध होणार नाही. त्यामुळे साखरेचा भाव १०० रुपयांवर गेल्याशिवाय राहणार नाही. पण बहुधा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत, असे कारखानदारांनी ठरवले असावे असा आरोप शेट्टी यांनी केला.


















