कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ऊसदराचे आंदोलन हिंसक, हेरवाड, नांदणीत उसाचे ट्रॅक्टर पेटवले

जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि विविध शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेऊन उसाला प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल आणि १०० रुपये दुसरी उचल कारखाने बंद होताना तर २०० रुपये पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी देण्याबाबत एकमत झाले होते. मात्र, शिरोळ तालुक्यात ‘आंदोलन अंकुश’ला हा दर मान्य नसल्याने संघटनेने शेतकऱ्यांना ऊस तोडी स्वीकारू नयेत, असे आवाहन करत काही ठिकाणी ऊस तोडी रोखल्या. ऊस दरासाठीचे हे आंदोलन शिरोळ तालुक्यात हिंसक बनले. हातकणंगले तालुक्यातील साखर कारखान्यांसाठी सुरू असणारी ऊस वाहतूक हेरवाड आणि नांदणी येथे रोखून अज्ञात व्यक्तींनी दोन ट्रॅक्टर-ट्रॉली पेटवून दिल्या. शनिवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांमध्ये अस्वस्थता आहे.

जिल्हा प्रशासनाने ऊस दराबाबत तोडगा काढताना सर्वच संघटनांना एकत्र करण्याची गरज होती. मात्र तसे घडलेले नाही. दराचा ‘आंदोलन अंकुश’ संघटनेला बैठकीचे निमंत्रण दिले गेले नाही. बैठकीतील निर्णयांची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे ‘आंदोलन अंकुश’ संघटनेकडून ऊसदराचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. इतर कारखान्यांचा हंगाम सुरू असताना शिरोळ तालुक्यात आंदोलन तापले आहे. आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. आधीच पाणीटंचाई, दुष्काळसदृश स्थिती यामुळे शेतकरी आणि कारखानदार मेटाकुटीला आले आहेत. अशा स्थितीत पुन्हा आंदोलन सुरू झाल्यास ते कोणालाही परवडणारे नाही. ऊस दराचा हा तोडगा शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. साडेचार हजार रुपये प्रतिटन दर देणे कारखान्यांना शक्य असतानाही अपेक्षित दर मिळाला नसल्याचे आंदोलन अंकुश संघटनेचे म्हणणे आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here