कोल्हापूर : गतवर्षीचा ऊस गळीत हंगाम संपून मोठा कालावधी उलटला, तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचा दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यांत जमा केलेला नाही. सध्या नवीन हंगामाची पूर्वतयारी सुरू असून, वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि मशागतीसाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी गत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांच्याकडे केली.
यावेळी ‘स्वाभिमानी’ने दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडे ५०० टनांपेक्षा अधिक ऊस गाळपासाठी दिलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत एकाही साखर कारखान्याने ही माहिती दिलेली नसल्याने ती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, राज्य कार्यकारिणी सदस्य जयकुमार कोले, सचिन शिंदे, विशाल चौगुले, पुरंदर पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, तानाजी देसाई, तानाजी मगदूम, अरुण मगदूम, बाजीराव पाटील, धुळगोंडा पाटील, नितेश कोगनोळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

















