कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. कर्नाटक राज्यातील आंदोलनाची तीव्रता पाहता, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मध्यस्थी केली आहे. सीमाभागातील तोडग्यासाठी त्यांनी सोमवारी (दि.२६) बेळगाव विधानसभा येथे साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्र सरकार २० नोव्हेंबरच्या आत साखरेची किमान विक्री किंमत निश्चित करणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर उसाला योग्य पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी (दि. २५) कोल्हापूर जिल्ह्यात मोटारसायकल रॅलीचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारच्या सकारात्मक पवित्र्यामुळे आणि डी. के. शिवकुमार यांच्या मध्यस्थीमुळे कर्नाटकातील कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालत आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील तातडीने राज्यातील साखर कारखान्यांना ऊस दर जाहीर करण्यास भाग पाडावे आणि गळीत हंगाम योग्य दराने सुरू करण्याबाबत चर्चा करावी. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, राजाराम देसाई, डॉ. बाळासाहेब पाटील, विशाल चौगुले, जयकुमार कोले, सचिन शिंदे, बाजीराव पाटील, तानाजी मगदूम, दीपक पाटील आदी उपस्थित होते.


















