कोल्हापूर : आगामी गळीत हंगामासाठी तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यातील मिल रोलरचे पूजन वारणा समुहाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. विनय़ कोरे यांच्या हस्ते झाले. कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगाम जोडणी कामाचा प्रारंभ मिल रोलर बसवून करण्यात आला. दसऱ्या मिल रोलरचे पूजन उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत आणि उपस्थित संचालकांच्या हस्ते झाले. कारखान्यातील सर्व कामे लवकर पूर्ण करून निर्धारित वेळेत हंगामाचा प्रारंभ करण्याचा प्रयत्न आहे. हंगामात १४ लाख मेट्रिक टनांहून अधिक उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे अशी घोषणा समूहाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली.
कारखान्याच्या यंदाच्या ६८ व्या गळीत हंगामामध्ये अधिकाधिक उसाचे गाळप करण्यासाठी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस वारणा साखर कारखान्याकडे गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. कोरे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. वारणा विद्यापीठाचे एन. एच. पाटील, संचालक सुभाष पुरंदर पाटील, श्रीनिवास डोईजड, विजय पाटील, किशोर पाटील, उदय पाटील, सुभाष जाधव, विजय धनवडे, सुभाष कणसे, डॉ. प्रताप पाटील, संदीप जाधव, रंजना पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत उपस्थित होते.

















