महाराष्ट्रातील सहा साखर कारखान्यांच्या ५६४ कोटींच्या कर्जाची होणार फेरतपासणी; बड्या नेत्यांशी संबंधित कारखानेही रडारवर !

पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून (NCDC) महाराष्ट्र शासनामार्फत खेळते भांडवल आणि भांडवली खर्चासाठी कर्ज मिळालेल्या राज्यातील सहा सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाची फेरतपासणी करण्याचे आदेश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत. या सहा कारखान्यांना एकूण ५६४ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.कर्जाची रक्कम ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आली होती, त्याच कारणासाठी तिचा वापर झाला आहे का, तसेच कर्जाची परतफेड नियमानुसार होत आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. कर्जाचा विनियोग नियमबाह्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांकडून कारखान्यांची प्रत्यक्ष तपासणी

ChiniMandi WhatsApp Channel

NCDC कडून महाराष्ट्र शासनामार्फत सहा सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरित करण्यास ३ ऑगस्ट २०२३ आणि २६ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयांद्वारे मंजुरी देण्यात आली होती. या कर्जाचा विनियोग आणि परतफेड याबाबत प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी साखर आयुक्तालयातील अधिकारी संबंधित कारखान्यांना भेट देणार आहेत. तपासणीदरम्यान विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (साखर) यांनी व्यक्तिशः उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील साखर सहसंचालकांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.संबंधित साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक तसेच कर्जाच्या विषयाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

‘या’ सहा कारखान्यांची होणार तपासणी –

साखर कारखाना                                                  जिल्हा                       कर्जाची रक्कम

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना            पुणे                             १५० कोटी

निरा-भीमा सहकारी साखर कारखाना                            पुणे                               ७५ कोटी

श्री शंकर सहकारी साखर कारखाना                             सोलापूर                      ११३.४२ कोटी

भीमा सहकारी साखर कारखाना                                 सोलापूर                      १२६.३८ कोटी

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना                            जालना                        ३४.७४ कोटी

विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना                     सांगली                           ६५ कोटी

एकूण कर्ज : ५६४.५४ कोटी रुपये

बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित कारखानेही यादीत

यादीत विविध राजकीय नेत्यांशी संबंधित साखर कारखान्यांचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि निरा-भीमा सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्यांचा समावेश आहे. दोन्ही कारखान्यांना मिळून २२५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. हे दोन्ही कारखाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संबधित आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील श्री शंकर सहकारी साखर कारखाना हा माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखाना आहे. तसेच भीमा सहकारी साखर कारखाना (टाकळी सिकंदर) याचाही तपासणीमध्ये समावेश असून, तो भाजप खासदार धनंजय महाडिक आणि विश्वराज महाडिक यांच्याशी संबंधित आहे. जालना जिल्ह्यातील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना हा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याशी संबंधित आहे. तर सांगली जिल्ह्यातील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली चालतो. नाईक हे सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे आहेत.

तपासणीनंतर अहवाल; त्यानंतर पुढील कारवाई

‘चीनीमंडी’शी बोलताना राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, NCDC कडून साखर कारखान्यांना खेळते भांडवल आणि भांडवली खर्चासाठी देण्यात आलेल्या कर्जाचा नियमांनुसार विनियोग झाला आहे की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर कर्जाच्या विनियोगासह परतफेडीबाबतचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर अहवालाच्या आधारे नियमानुसार योग्य ती पुढील कारवाई केली जाईल, असे डॉ. कोलते यांनी स्पष्ट केले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here