सांगली : सध्या राज्यातील साखर कारखान्यांमध्ये हंगामातील एकूण उसावरून तयार झालेल्या साखरेच्या प्रमाणावर सरासरी उतारा निश्चित केला जातो. जर दहा लाख टन उसापासून १२ लाख क्विंटल साखर तयार झाली, तर १२ टक्के उतारा गृहित धरला जातो. मात्र, उत्पादन प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांमुळे हा उतारा कृत्रिमरीत्या कमी दाखवला जात असल्याचा आरोप ‘आंदोलन अंकुश’ संघटनेने केला आहे. उसातील प्रत्यक्ष साखरेच्या प्रमाणावर ऊस दर ठरविण्याची मागणी संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे. परदेशात ‘केन सॅम्पलर’ सारख्या आधुनिक यंत्राद्वारे उसाची त्वरित तपासणी करून दर निश्चित करण्याची प्रणाली वापरली जाते, पण अशा यंत्रणेला कारखानदारांकडून विरोध होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
चुडमुंगे म्हणाले की, जागतिक स्तरावर कृषी उत्पादनांची किंमत त्यांच्या गुणवत्तेनुसार ठरवली जाते. उसाच्या बाबतीत गुणवत्ता म्हणजे त्यातील साखरेचे प्रमाण. मात्र, भारतात अद्याप उसातील साखरेचे थेट मोजमाप करण्याची व्यापक पद्धत अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. सध्या राज्यात उसाच्या दरनिश्चितीसाठी वापरली जाणारी ‘सरासरी उतारा’ पद्धत शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी ठरत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसातील प्रत्यक्ष साखरेच्या प्रमाणाऐवजी कारखान्याच्या सरासरी उताऱ्यावर दर ठरवला जातो. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक अन्याय होत असल्याचा दावा संघटनेने केला. साखर कारखान्यांमध्ये साखरेची पोती बाजूला काढणे, उसाचा रस वाया घालवणे, मळी किंवा बगॅसमध्ये जादा साखर जाणे, इथेनॉल निर्मितीसाठी रसाचा जास्त वापर करणे अशा प्रकारांचा समावेश असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. याचा थेट परिणाम एफआरपी दरावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.


















