महाराष्ट्र : साखर उद्योगातील प्रश्नांवर ४ नोव्हेंबरला पुण्यात केंद्रीय अभ्यास समितीची बैठक

पुणे : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासमोर असलेल्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्रा. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीची महत्त्वपूर्ण बैठक ४ नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर आयुक्तालयात होणार आहे.

या बैठकीत प्रा. रमेश चंद यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विविध शेतकरी संघटना, साखर कारखान्यांच्या संस्था, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) यांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली जाणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत साखर उद्योगातील प्रलंबित प्रश्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांवर विचारविनिमय होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

संस्थानिहाय चर्चेचे वेळापत्रक जाहीर

पुण्यातील साखर संकुल येथे ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी विविध संस्थांच्या चर्चेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

सकाळी ९.३० ते १०.१५ : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या प्रतिनिधींशी चर्चा.
सकाळी १०.३० ते दुपारी १.०० : राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक.
दुपारी १.४५ ते ३.०० : राज्य सहकारी साखर संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)च्या प्रतिनिधींशी चर्चा.
दुपारी ३.०० ते ३.३० : ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए)च्या प्रतिनिधींसोबत बैठक.
दुपारी ३.४५ ते सायंकाळी ४.४५ : राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते आणि राज्य सरकारच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा.

ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर उपाययोजनांचा विचार

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून साखर उद्योगातील सर्व संबंधित घटकांचे म्हणणे जाणून घेऊन त्यांच्या समस्या आणि संभाव्य उपाययोजनांबाबत केंद्र सरकारला शिफारसी केल्या जाणार आहेत. ४ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत शेतकरी संघटना, साखर उद्योगातील संस्था आणि सरकारी अधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या सूचना व मागण्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर क्षेत्राशी संबंधित समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश चंद यांच्या उपस्थितीत ४ नोव्हेंबर रोजी पुण्यात साखर उद्योगाशी निगडित सर्व घटकांच्या निमंत्रित प्रतिनिधींशी चर्चा होणार असून, त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विचारविनिमय केला जाणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here