मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन पॉलिसी आणि उपपदार्थ निर्मिती धोरण निश्चित करण्याबाबत सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे बैठक घेण्यात आली. साखरेवर साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी केवळ अवलंबून न राहता उपपदार्थांच्या निर्मितीला चालना देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या विविध उपपदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना केली. यावेळी पवार यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात ‘सॉफ्ट लोन’ योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाच्या उपसचिव सविता जावळे आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सॉफ्ट लोन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. साखर कारखानदारीसाठी नवे धोरण ठरवले गेल्यास कारखान्यांमध्ये सौर ऊर्जा, सहवीज निर्मिती, १ जी इथेनॉल, मल्टिफीड, टू जी इथेनॉल, सीबीजी, हरित हायड्रोजन, बायो बिटुमिन, जैव रसायने आणि एस.ए.एफ या घटकांच्या निर्मितीस गती मिळणार आहे. त्या अनुषंगाने सॉफ्ट लोन योजनेमुळे साखर कारखान्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल, शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे वेळेत देणे शक्य होणार आहे , असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.


















