मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मुद्रा’ कर्ज योजनेत महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांकडून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर परराज्यातील बँकांतून लाखो रुपयांची कर्जे उचलण्यात आल्याचे साम वृत्तवाहिनीच्या तपासातून उघड झाल्याचे वृत्त ‘सरकारनामा’ने प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्रात सुमारे सव्वा लाख ऊस वाहतूकदार विविध साखर कारखान्यांसाठी काम करतात. टेंडर प्रक्रियेदरम्यान जमा केलेले पॅनकार्ड, बँक पासबुक यांसारखी कागदपत्रे वापरून संबंधित वाहतूकदारांच्या नावावर कर्नाटकातील राष्ट्रीयकृत बँकांतून ६ लाख ते ३५ लाख रुपयांपर्यंतची कर्जे मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे राज्यातील सुमारे ४० हजार वाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवरही विपरीत परिणाम झाला आहे.
कसा उघडकीस आला प्रकार?
वाहतूकदारांनी स्वतःच्या गरजांसाठी नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये अर्ज केला असता, त्यांच्या नावावर आधीच मोठी कर्जे प्रलंबित असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता, ज्या साखर कारखान्यांसाठी ते काम करत होते, त्याच कारखान्यांशी संबंधित कागदपत्रांचा वापर करून ही कर्जे घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
हजारो कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
या संपूर्ण प्रकरणात सुमारे १,००० ते १,५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि निरपराध वाहतूकदारांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रभावित वाहतूकदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील मोठ्या संख्येने ऊस वाहतूकदार या प्रकरणामुळे प्रभावित झाल्याने हा कथित घोटाळा अत्यंत गंभीर मानला जात आहे. संबंधित आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे.















